रिकाम्या, डोक्याचा जिनी


माणसाच्या डोक्याला सारखं काहीतरी काम लागतं, ते काम आपण दिलं नाही तर तेच डोकं आपला जीव खातं.. तसं व्हायचं नसेल तर बघा जरा ही गोष्ट..



          कडाक्याची थंडी कमी व्हायला लागली होती. स्टेशनपासून माझ्या ऑफिसपर्यंत पोहोचायला 10 ते 12 मिनिटे लागतात. रस्त्यामध्ये  नदीच्या पूलावरून जाताना , नदी काठी उभ्या असलेल्या बोटी, निळसर पाणी, आजूबाजूच्या सुंदर झाडे असा देखावा दिसतो. छान ऊन पडलेलं होतं. त्यामुळे अंगावर ट्रेंच कोट, स्वेटर, स्कार्फ असं आज ओझं नव्हतं. त्यामुळे जरा हलकं वाटलं होतं.
           ऑफिसमध्ये पोहोचलो, परत डोक्यात विचारांचं वादळ चालू झालं. ई-मेल उघडून त्यात लक्ष घालायचा प्रयत्न केला. तेवढ्यात माझ्या एका मित्राचा whatapp वर गुड़ मॉर्निंग मेसेज आला. मी रिप्लाय केला, माझा रिप्लाय तसा जबरदस्तीचा होता. कदाचित काहीतरी बिनसलं आहे हे माझ्या मित्राला जाणवलं असेल.

            माझा हा मित्र तसा नागपूरचा. आमची ओळख होऊन ६-७ महिने झाले असावेत. पण त्याच्याशी दोस्तीचा सूर पटकन जमला. त्यानं मला जेवणा चं आमंत्रण दिलं. मागच्या काही दिवसांपासून माझे जेवणावरही लक्ष नव्हतं. त्यामुळे मी टाळायचा प्रयत्न केला; पण त्यानं आग्रह धरला त्यामुळे शेवटी मी तयार झालो.
        आम्ही लंच अवरमध्ये भेटलो. नेहमी माझे मत विचारणारा हा मित्र आज मला थेट नदी काठाच्या एका मोठ्या हॉटेल मध्ये घेऊन गेला. तिथ आम्ही एका कोपर्‍यातली खिडकी शेजारी जाऊन बसलो. खिडकीतून बाहेर पुलाचे सुंदर दृश्य दिसतं. आजुबाजुला मंद असा दरवळणारा सुगंधित रूम फ्रेशनेस चा सुवास येत होता. त्यामुळे वातावरण अगदी सुरेख झाल होत. 
         आणि अचानकपणे माझ्या मित्रानं विचारलं, व्हॉट्स राँग? मी माझा मूड लपवायचा प्रयत्न केला; पण तो प्रयत्न फसला. माझ्या मित्राला माझ्या मन:स्थितीची कल्पना आली, तो जास्त खौलात जायच्या भानगडीत नाही पडला. तो म्हणाला, मी एक गोष्ट सांगतो तुला.

          एक गरीब माणूस होता. रोजंदारी करुन जीवन जगायचा. एक दिवस सकाळी उठल्यानंतर त्याला जाणवलं की त्याच्याकडे फक्त १00 रुपये आहे. १00 रुपया मध्ये तर आपल्या एकट्याचे 2 वेळेच जेवण सुद्धा मिळत नाही तर आपल्या परिवाराच पोट कसं भरणार?
      काहीतरी करता येईल का, या विचारानं तो घराबाहेर पडला. रस्त्यात एक माणूस जुन्या वस्तू विकत होता. त्यानं कुतूहलाने त्या गोष्टी बघितल्या, त्यात एक छोटा दिवा होता आणि त्यावर लिहिलं होतं, हवी ती गोष्ट देणार्या जिनी असलेला दिवा किंमत १00 रुपये त्याने विक्रेत्याला विचारलं की हे काय आहे ?

       विक्रेता म्हणाला, या दिव्यात जिनी आहे. जो तुमची हवी ती इच्छा पूर्ण करेल. गरीब माणूस आश्चर्यचकित होऊन म्हणाला, मग तुम्ही विकत का आहात? तो विक्रेता म्हणाला, या जिनीचा एक प्रॉब्लेम आहे. त्याला जर तुम्ही काम नाही दिलं तर तो तुमच्याकडची एक एक गोष्ट संपवायला लागतो. त्यामुळे त्याला सारखं कामात मग्न ठेवण गरजेचं आहे, जे मला शक्य नाही. तो गरीब माणूस एकदम आनंदी झाला आणि त्याने 100 रुपया मध्ये तो दिवा घेतला. प्रयत्न म्हणून त्याने जिनीला जेवण देण्याची मागणी केली. जिनीने क्षणाधात त्याला जेवण दिलं. शंभर रुपयाचा उपयोग यापेक्षा अजून चांगला असता या कल्पनेने तो गरीब माणूस उल्हसित झाला. उरलेला दिवसात त्या गरीब माणसाने बऱ्याच इच्छा त्या जिनीकडून पूर्ण करुन घेतल्या. रात्र झाली तो गरीब माणूस थकला; पण जिनी थकला नव्हता त्याला काम हवं होतं.

         तो गरीब माणूस रात्रभर काही ना काही काम त्या जिनीला देत राहिला. दुसरा दिवस उजाडला , त्या गरीब माणसाकडे अक्षरशा: देण्यासारखं काही काम राहिलं नाही. तो अगदी त्रासून गेला. तो त्याचा प्रॉब्लेम घेऊन एका साधूकडे गेला, साधूने त्या माणसाचा प्रॉब्लेम ऐकला आणि त्याला एक मोठी लांब काठी दिली आणि सांगितलं की ही काठी घे आणि तुझ्या घराच्या मागील अंगणात उभी रोव.

         तुझ्याकडे जिनीसाठी काही काम नसेल तेव्हा त्या जिनीला या काठीवर तोपर्यंत चढायला आणि उतरायला सांग जोपर्यंत तू थांब म्हणणार नाहीस. दुसर्या दिवशी साधू त्या गरीब माणसाच्या घरी गेला आणि त्याने जिनीबद्दल विचारले ते दोघेही जिनीला बघायला घराच्या माग गेले. पाहतात तर काय रात्रभर त्या काठीवर चढ-उतर करुन तो दमला होता आणि गाढ झोपला होता.

      डोक्याचंही तसंच आहे. हे डोकं जगातली प्रत्येक हवी असणारी गोष्ट मिळवण्यास मदत करते. पण या डोक्याला काही काम नाही दिलं तर हेच डोकं आपल्याकडील एक एक गोष्टी संपवायला लागते. या गोष्टीमध्ये आपल्या चांगल्या सवयी, तब्येत, नाते, पैसा यांचाही समावेश होतो.

        तर मग या डोक्याला बिझी कसं ठेवायचं? सोपी गोष्ट आहे. रोज नवीन काहीतरी शिकायचं. नवीन जागांना भेटी द्यायच्या, नवीन मित्र बनवायचे म्हणजे डोकं थकून जाईल. आमचा बरीटो संपला होता, पण माझा चेहरा मात्र फुलला होता. पुढच्या वेळी तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या डोक्यात जर वादळ उठलं असेल तर ही जिनीची गोष्ट नक्की ऐकवा.

Post a Comment

0 Comments